पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स , चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो, पण जेवणापूर्वी 'वदनी कवळ' आणि श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो ll१ll वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक, फ्रुटपंच प्यायला शिकलो, पण आपोष्णी घ्यायला विसरलो, सार-सुधारस विसरलो ll२ll चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून, तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो, पण शेवयाची छान खीर खायला विसरलो ll३ll हाताने वरण भात, ताक भात कालवून खायची लाज वाटू लागली, आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून तोंडात घालायला शिकलो ll ४ll पाव भाजीवर अमूलचा जाड लगदा घालायला शिकलो , पण गरम गरम वरण भातावरची तुपाची धार विसरलो ll५ll बिर्याणी, फ़्राईड राइस, जिरा राइस खायला शिकलो, पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय..??

    ह्या नातवंडांच्या प्रश्नात अडखळलो ll६ll पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर ताव मारायला विसरलो आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम, टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो ll७ll दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे तुकडे करून खायला शिकलो, पण आईने शिकवलेले, एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार विसरलो ll८ll सँलड या भपकेदार नावाने झाडपाला खायला शिकलो, पण कोशिंबीर, चटणी, रायते आणि पंचामृत खायचे विसरलो ll९ll इटालिअन पिझ्झा, पास्ताची चटक लागली, आणि आळूची पातळ भाजी, भरली वांगी अन् बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली ll१०ll मठ्ठा, ताक, सार आवडेनासे झाले आणि फ्रेश लेमन ज्यूस, सोडा का नाही ?? म्हणून विचारू लागलो ll११ll साखर भात, गव्हाची खीर, लापशी इतिहास जमा झाली अन स्वीट, स्वीट म्हणून आईस्क्रीम स्लाईसची गुलामी स्वीकारली ll१२ll मसाल्याचे वास तसेच ठेवून, पेपर नँपकीनने हात, तोंड पुसायला शिकलो पण पाण्याने खळखळून तोंड धुवायला मात्र विसरलो ll१३ll