सलाड हा आजकालच्या जेवणाच्या मेनूतील एक अत्यावश्‍यक आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. सलाड हे नाव जरी नवीन वाटत असलं तरी तो पदार्थ मात्र प्रत्यक्षात तसा नवा नाही. अहो, आपली कोशिंबीर माहीत आहे ना तुम्हाला?

ते आपली नेहमीची कोशिंबिर म्हणजेच ते सलाड! म्हणजे हे सलाड आपण पूर्वीपासून खात आलो आहोत. मग आताच का त्याची इतकी चर्चा करतोय?

पूर्वी होती ती दिनचर्या आता आपली कोणाचीच राहिली नाही. हल्ली आपले शारीरिक ताणताणाव प्रचंड वाढले आहेत. आपला आपल्या ऑफिसपर्यंतचा प्रवास. त्यात होणारी धावपळ आणि मानसिक ओढाताण यापासून ते आपल्या ऑफिसमधील आपल्या समोरची टार्गेट्‌स आणि त्यांनी येणारा मानसिक तणाव इथपर्यंत. हे सगळं आता स्त्री-पुरुष सर्वाना करावं लागतंय. भोवतालची परिस्थिती, दिनचर्या आणि खाणेपिणे हे मात्र बदलत गेलंय. आता हा बदल त्याच शरीर धाटणीला पेलवत नाहीत, झेपत नाही आणि त्रास सुरू होतात आणि ते काही रोगांच्या स्वरूपात दिसू लागले आहेत. मूळव्याध, बद्धकोष्ठता हे बहुतकरून अनेकांना होणारे त्रास होऊ नयेत म्हणून आपल्याला आपल्या जेवणाच्या ताटात काही पदार्थांचे प्रमाण बदलायला हरकत नाही. म्हणून एखादा चमचा कोशिंबिरीऐवजी आता वाटीभर सलाड खायला हवे. त्यामुळे आपण तंतुमय पदार्थ खाऊ लागतो. ज्यांचा आपल्या पोटाला चांगला

उपयोग होतो. हल्ली सलाड देखील इटलियन, मेक्‍सिकन अशी असतात. आपल्या नव्या पिढीला आवडतात. त्यात भाज्या जास्त आहेत आणि चीज वगैरेचे प्रमाण काही आहे हे असे पाहून हे प्रकार देखील खाऊन पाहायला हरकत नाही. पिझ्झा आणि मैदा प्रकार कायम खाणाऱ्या आपल्या युवा पिढीला ही सलाड खायला हरकत नाही.

कारण सतत पिझ्झा ब्रेड खाणाऱ्या या मंडळीना पोटासंदर्भात लवकर तक्रारी सुरू होऊ शकतील. मधुमेह, बीपी, मूळव्याध, थायरॉईड हे रोग खूप कमी वयात आले आहेतच. तर मग आपण जेवणात हे सलाड घेत जाऊ. विविध प्रकार याचे करता येतील. गाजर, काकडी, कांदा, टोमॅटो सलाडची पाने, कोबी आणि बऱ्याच भाज्या कच्चे मूग आणि लिंबू वापरून हा पदार्थ आपल्या आवडीनुसार बनवावे.

कोबी आणि टोमॅटोचे सलाड
कोबी आणि टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. तसेच मॅग्नीशियम, आयरन, सल्फर आणि कॅल्शियम इत्यादी पोषक तत्वे देखील कोबी आणि टोमॅटोच्या सलाडमध्ये असतात. हे सलाड खाल्ल्यानंतर इम्यूनिटी वाढते.

पाहा कोबी आणि सलाड तयार करण्याची सोपी पद्धत- कोबी आणि दोन टोमॅटो घ्या. तसेच एक काकडी देखील कापून घ्या. त्यानंतर कापलेली काकडी, चिरलेला कोबी आणि कापलेले टोमॅटो हे एकत्र मिक्स करून त्यामध्ये तुळशीची पाने, आलं आणि लिंबूचा रस मिक्स करा. हे सलाड सकाळी नाश्ता म्हणून तुम्ही खाऊ शकता.

किवी सलाड
किवी आणि स्ट्रॉबेरीच्या या सलाडमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. ज्यांना ब्लड प्रेशरची समस्या आहे, अशांनी किवी आणि स्ट्रॉबेरीच्या सलाडचा समावेश डाएटमध्ये करावा.

किवी आणि स्ट्रॉबेरीचं सलाड तयार करायची पद्धत-
किवी आणि स्ट्रॉबेरी बारीक कापा. त्यामध्ये केळी, द्राक्ष आणि ब्लू बेरी मिक्स करा. त्यानंतर या सलाडमध्ये मिठ आणि जिऱ्याची पावडर मिक्स करून खा. हे सलाड तुम्ही दिवसभरात कधीही खाऊ शकता.