पाणी हे मानवी शरीरासाठी गरजेचं आहे. पाण्याचे शरीराला अनेक फायदे होतात मात्र हा फायदा होण्यासाठी पाणी योग्य प्रकारे प्यायला हवं. पाणी शरीरासाठी औषधासारखं आहे, त्याच्या कमतरतेमुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात.

उन्हाळ्यात पाण्याची टंचाई सर्वाधिक असते आणि ती टाळण्यासाठी ते पिण्याची योग्य पद्धत माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हीही पाणी पिताना या चुका करत असाल तर त्या आजच बदला.

एकाच वेळी भरपूर पाणी पिणं

तहान लागली की आपण एकाचवेळी भरपूर प्रमाणात पाणी पितो. पाणी पिणं ही चांगली सवय आहे. मात्र अधिक प्रमाणात पाणी पिणं योग्य नाही. एका दिवसात तीन ते चार लीटर पाणी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमचा स्तर कमी होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी पिऊ नये.

उभं राहून पाणी पिणं

आयुर्वेदानुसार, ज्यावेळी आपण उभं राहून पाणी पितो तेव्हा पोटावर अधिक ताण येतो. कारण उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी सरळ इसोफेगसद्वारे पोटात जातं. यामुळे पोटाजवळील डायजेस्टिव्ह सिस्टीमला नुकसान होण्याची शक्यता असते.

खाताना पाणी पिणं

जेवताना पाणी पिणं योग्य नाही. जर तुम्हाला अशी सवय असेल तर तुम्ही आजच बदला. जेवणासोबत पाणी प्यायल्यास पोटफुगीचा त्रास जास्त होतो. जेवण करण्यापूर्वी 30 मिनिटं आणि जेवणानंतर 30 मिनिटांनी पाणी प्यायलं पाहिजे.

खूप थंड पाणी पिणं

कडाक्याच्या उन्हाळ्यात फ्रीज उघडून थंड पाणी पिणं सामान्य गोष्ट आहे. थंडगार पाणी प्यायल्याने तात्पुरतं बरं वाटतं. मात्र हे महिलांसाठी घातक ठरू शकतं. थंड गार पाणी प्यायल्याने योनि तंत्रिकेचं खूप नुकसान होण्याची शक्यता असते.