साखरेची पातळी नियंत्रित करणे मोठे आव्हान असते. साखरेचे प्रमाण वाढल्याने मधुमेह ( Diabetes ) सोबतच उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी विविध समस्या निर्माण होत असतात.

त्यामुळे बहुतेक लोक रक्तातील साखरेच्या पातळीबाबत जागरूक असतात. दरम्यान, रिकाम्या पोटी साखर का वाढते याबद्दल अनेक लोकांमध्ये मतभेद आहेत. त्यामागे प्रत्येकाचे वेगवेगळे तर्क असतात. वास्तविक, अनेकांची साखरेची पातळी सकाळी (Morning) वाढलेली असते. अशा परिस्थितीत रिकाम्या पोटी साखर का वाढते, असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच साखरेची सामान्य पातळी किती असावी? असाही प्रश्‍न निर्माण होत असतोच. मधुमेहाचा मूत्रपिंड, हृदय, डोळे, त्वचा आणि मेंदूवरही परिणाम होतो. त्यामुळे मधुमेहींनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.

सकाळी साखरेची पातळी किती असावी?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सकाळी रिकाम्या पोटी साखरेची पातळी सामान्य करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण साखरेची पातळी वाढल्याने व्यक्तीला अनेक प्रकारे त्रास होऊ शकतो, तसेच अनेक गंभीर आजारदेखील होऊ शकतात. असे मानले जाते, की सकाळी रिकाम्या पोटी सामान्य रक्तातील साखरेची पातळी 70-100 mg/dl असावी. जर साखरेची पातळी 100-125mg/dl झाली तर ते धोकादायक ठरते. रक्तातील साखरेची पातळी 126mg/dlपेक्षा जास्त मधुमेहाच्या श्रेणीत येते. या परिस्थितीत, आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अन्यथा समस्या वाढू शकते.

साखर कशी नियंत्रित करावी?

1) रात्री वेळेवर जेवण्याचा प्रयत्न करा, तसेच नेहमी सकस आहार घ्यावा.
2) जेवण केल्यानंतर लगेच झोपू नका किंवा बसून कामे करू नका, शतपावली करावी.
3) रात्री स्नॅक्स, कर्बोदके घेणे टाळा. त्यामुळे सकाळी रक्तातील साखर वाढण्याची शक्यता अधिक असते.
4) शरीराला सतत 'हायड्रेट' ठेवा. जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
5) सकाळी नेहमी नाश्ता करावा. नाश्त्यात फक्त आरोग्यदायी गोष्टीच खाव्यात.