साधारणपणे संध्याकाळच्या कार्यक्रमात प्रामुख्याने ज्या गोष्टी समाविष्ट असतात त्या म्हणजे संध्याकाळचा चहा नाष्टा आणि मग मस्तपैकी फिरायला जाणे. दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण ह्या दोन्हीमधली दरी भरून काढण्याचे काम हे संध्याकाळच्या चहा नाष्ट्याचे असते.

दुपारची झोप झाली किंवा कामावरून दमून भागून आल्यावर चहाचा एक कप प्यायल्याशिवाय कशी पुढच्या कोणत्याच कामाला गती येत नाही. चहा म्हटला की त्या सोबत, खारी बिस्किटे, ब्रेड, तसेच आवडीनुसार वेगवेगळे पदार्थ हे संध्याकाळच्या खाण्यसाठी आवर्जून तयार केले जातात. हा असा चहा नाष्टा झाला की मग फेरफटका.

संध्याकाळचा फेरफटका म्हणजेच चालणे. हासुद्धा एक दैनंदिन व्यायामाचाच प्रकार आहे. चालणे हा एक अत्यंत साधा सोपा बिन खर्चाचा आणि कोणालाही करता येण्यासारखा व्यायाम प्रकार आहे. चालायचे कसे ह्याचीसुद्धा एक पद्धत ठरलेली आहे.

चालताना डोके, मान, पाठ ही एका रेषेत सरळ असावी, दोन्ही पायातील अंतर सारखे असावे, चालण्याची गती एकसारखी ठेवावी, चालताना दोन्ही हात मोकळे ठेवावेत. ते सारख्या प्रमाणात मागे व्हायला हवेत. एका चालण्याच्या व्यायामात अनेक हालचालींचा समावेश असल्याने ते अवयव आणि स्नायू ह्यांना व्यायाम घडतो आणि ते अधिक कार्यक्षम बनतात.