टोमॅटो म्हणताच आठवतो तो त्याचा लालबुंद रसरशीतपणा. भाजी, आमटी, भात, रस्से सगळ्या पदार्थांची लज्जत वाढविण्यात टोमॅटो अग्रेसर आहे. प्रत्येक घरात कांदे, बटाटे यांच्याबरोबर टोमॅटोदेखील आवर्जून आणलेला असतोच.

कोणी आजारी असेल, पाहुणे आलेले असतील, तर टोमॅटोचं सूप केलं जातं. झटपट होणारं, चवदार आणि जिभेची चव वाढविणारं. सॅलाडसाठी टोमॅटो हवाच… रंग, रूप, चव सर्वकाही बहाल असणारा टोमॅटो तेवढाच आरोग्यादायीही आहे.

अनेक अंगांनी श्रेयस असणारा टोमॅटो तितकाच प्रेयसही आहे. टोमॅटोमध्ये अनेक आवश्‍यक घटक असतात. ऍन्टिऑक्‍सिडन्ट्‌स, भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए व सी यांनी समृद्ध, फॉलिक ऍसिड, पोटॅशियम, बीटा-कॅरोटिन, ल्युटिन, फॉलेट, व्हिटॅमिन बी-सहा इ. टोमॅटोमध्ये एक अतिशय गुणकारी असा महत्त्वपूर्ण घटक असतो, तो म्हणजे 'लायकोपिन'. टोमॅटोचा लाल रंग या घटकामुळेच असतो. याच्या ऍन्टिऑक्‍सिडन्ट गुणधर्मामुळे शास्त्रज्ञांचं लक्ष या घटकाकडे वेधलं गेलं आहे. टोमॅटो या घटकांमुळेच अनेक आजारांसाठी गुणकारी ठरला आहे. टोमॅटोचं शास्त्रीय नाव आहेsolanum lycopersicum आणि कूळ आहे solanaceae

टोमॅटो हा प्रामुख्याने सौंदर्यवर्धक आहे. त्वचा आणि केस यांच्यासाठी टोमॅटो एक वरदानच आहे. वाढत्या वयाच्या खुणा सर्वप्रथम त्वचेवर, विशेष करून चेहऱ्यावर दिसू लागतात. सुरकुत्या, काळे डाग यांनी आपली त्वचा निस्तेज दिसू लागते; परंतु टोमॅटोमधील ऍन्टिऑक्‍सिडन्ट्‌समुळे त्वचा घट्ट व तजेलदार राहण्यास मदत होते. नियमित टोमॅटो खाण्याने तसेच टोमॅटोचा ताजा रस चेहऱ्यावर लावण्याने चेहऱ्याची त्वचा तरुण व टवटवीत दिसू लागते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठीही टोमॅटो उत्तम आहे. टोमॅटो व त्यातील व्हिटॅमिन 'ए' घटकामुळे दृष्टी सुधारते. मोतीबिंदूची वाढ रोखण्यातही टोमॅटोचे सेवन उत्तम भूमिका बजावते.

टोमॅटोचा रस, लिंबूरस, हळद आणि डाळीचे पीठ एकत्र करून त्याचा लेप डोळ्यांखाली नियमितपणे लावल्यास, डोळ्यांखालची काळी वर्तुळे, सूज नाहीशी होते. टोमॅटो उभा कापावा. कापलेला भाग साखरेत बुडवावा आणि स्वच्छ धुतलेल्या चेहऱ्यावरून हा टोमॅटो घासून गोलाकार फिरवावा. हे एक उत्तम नैसर्गिक स्क्रब आहे. त्यामुळे चेहरा स्वच्छ होतो आणि त्वचा तरुण, नितळ होते. टोमॅटो हे एक उत्तम, नैसर्गिक सौंदर्यप्रसाधन आहे. नियमितपणे टोमॅटो खाण्याने रक्तवृद्धी होते आणि ऍनिमियाला चार हात दूर ठेवणे शक्‍य होते. मॉर्निंग सिकनेसपासून सुटका होण्यासाठी ग्लासभर टोमॅटो रसात मीठ, मिरपूड घालून घेण्याने फायदा होतो.

अनेक प्रकारचे कॅन्सर रोखण्यात टोमॅटो महत्त्वाची भूमिका बजावतो. विशेषतः प्रोस्टेट ग्रंथींचा कॅन्सर, फुप्फुसाचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर यांवरील उपचारांत टोमॅटो गुणकारी आहे. कॅन्सर रोखण्यात टोमॅटोमधील लायकोपिनचा सहभाग शोधून काढण्यासाठी शास्त्रज्ञांचे अधिक संशोधन सुरू आहे. मधुमेहावरही टोमॅटो गुणकारी आहे. टोमॅटोमधील फायबरचे भरपूर प्रमाण आणि क्रोमियममुळे रक्तातील साखर कमी करण्यासाठी टोमॅटोचा खूप फायदा होतो. टोमॅटोमधील ऍन्टिऑक्‍सिडन्ट्‌समुळे वाढत्या वयानुसार होणारा मधुमेह रोखता येतो.
टोमॅटो हा पोटॅशियम, निऍसिन, फॉलेट आणिव्हिटॅमिन बी-सहा या घटकांचा पुरेपूर स्रोत आहे.

यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो, कोलेस्टरॉल कमी होते आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित अनेक विकार रोखता येतात. टोमॅटोमधील लायकोपिन हा महत्त्वाचा घटक पुरुषांमधील नपुंसकता दूर करण्यात उपयोगी ठरतो. टोमॅटो खाण्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत मिळते. टोमॅटोमधील व्हिटॅमिन के आणि कॅल्शियममुळे हाडे बळकट होतात.

टोमॅटोचा आहारात समावेश करताना काही काळजी घेणेही आवश्‍यक आहे. टोमॅटो कधीही काकडी, कलिंगड, दही आणि दुधाच्या पदार्थांसोबत खाऊ नये. काही लोकांना कच्चा टोमॅटो खाल्ल्याने त्रास होतो, ऍसिडिटी वाढते. त्यांनी टोमॅटो मिरपूड व जिरेपूड घालून खावा. अशा लोकांसाठी टोमॅटो सूप योग्य ठरते. टोमॅटोमधील व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य तर चांगले राहतेच, केसही चमकदार व बळकट होतात. टोमॅटोमुळे मेंदूतील पेशींना चालना मिळते. त्यामुळे मूड उत्साहवर्धक राहण्यास मदत होते. टोमॅटो खाण्यामुळे शांत झोप लागते. ज्या लोकांना नीट झोप लागत नाही, त्यांनी आहारात टोमॅटोचा समावेश जरूर करावा. टोमॅटोच्या बिया पेरून टोमॅटोची रोपे कुंडीत वाढविता येतात. घरचे टोमॅटो खाण्याचा आनंद काही आगळाच असतो.